Saturday, 15 October 2016

अभंगातून व्यक्त होताना ... 


जीवन म्हणजे रहस्यांची भली मोठी झोळी आहे. अगदी या निसर्गासारखी ज्यात चांगल्या तर काही वाईट गोष्टी दडलेल्या आहेत. जस जस आपण त्याला उलगडण्याचा प्रयत्न करू त्यारूप ते आपल्या समोर उलगडत राहतं . काही गोष्टी ज्ञात तर काही गोष्टी अज्ञात स्वरूपात राहतात. हा ज्ञानसागर जेव्हा व्यक्तिरूपात जेव्हा समजण्याचा जाणण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या विचारांना केंद्रबिंदू ठेवत नैसर्गिक व अनैसर्गिक हरेक बाबिना उसविण्याचं, घोळण्याचं व प्रसवण्याचं काम करतो. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या किंवा होत असलेल्या परिस्तिथीला व्यक्त होताना सजीव रूपात जागृत असलेल्या बुद्धीला कवी लेखणीच्या अभंग माध्यमांतून वृत्तीला वृत्तात मांडण्याचं काम करतो.

जीवन म्हणजे  रहस्यांची झोळी !
कोळिणीच्या जाळी त्या स्वरूप !!

जेव्हा असंख्य प्रश्नात माणूस पार गुंतून जातो स्वअस्तित्व शोधासाठी पार गुरफटलेला असतो. शोधाशोध सुरु होते. स्व:अस्तित्व शोधण्यासाठी थोर मोठे तर विश्व पालथं घालतो . शेवटी निराश , हताश होतो. मुळात तो स्वतातून स्वताचा होणारा संवाद विसरलेला असतो.  त्यामुळे तो मृगजळाच्या मागे धावल्यागत त्याची संभ्रम स्तिथी निर्माण होते. अशा परिस्तिथीत तो स्वताला कोसू लागतो. दुसऱ्याला दूषणे देऊ लागतो व दैवाला नावे ठेऊ लागतो . निराशावादेतून काही अशा रचना जन्माला येऊ शकतात कि...

कोठे शोधू आता  माझे अस्तित्व !
घातलेया विश्व  पालथे मी !!

  हळूहळू स्वतःला यातून सावरत, कालंतराने स्वताचा स्वताशी संवाद व्यायला लागतो. संपूर्णता स्वताशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा आपण  आपल्याला , जगाला या ब्रह्मांडाला सुद्धा उलगडू लागतो. त्या समाधी अवस्थेतून  सकारात्मक विचारांचा प्रवास, प्रवाह सुरु होतो ...

मी कणात कण   उसविलं आहे !
नि शोधले आहे   ब्रह्मांडाला !!


आपण आपल्या विचारांशी जेवढे प्रामाणिक राहू तेवढी प्रगती व आत्मिक समाधानाच्या जवळ राहू. हे मात्र खरे. कलयुगामध्ये सध्या चालू काळामध्ये बोट धरून शिकविणार .... राहिले कोठे किंवा एवढा वेळ आहे कुणाकडे ... स्वता स्वताचे गुरु बनण्याची , स्व घडविण्याची वेळ आली आहे. अगदी त्या फिनिकसाप्रमाणे ....

ना कुणीही दाता   ना कुणी विधाता
हो! माझा निर्माता   "मी" फिनिक्स !!

हल्ली आपण बघतो आहे .... सर्हास महापुरुषांच्या प्रतिमेला काळ  फासल्या जात आहे. हव्या त्या मार्गाने विडंबन होत आहे . का ?  त्याचा निषेध म्हणून शांती भंगण्यासाठी जाळपोळ दंगली जाणीवपूर्वक घडविण्यात येत आहेत . व विशिष्ट्य  समाजच का पुढे येतो. हाहि विचार करायला लावणारा प्रश्न . महापुरुषांचे कार्य समर्पक होते . विशिष्ट समाजा पुरता मर्यादित मुळीच नव्हते. संपूर्ण समाज जागृतीसाठी त्यांनी कार्य केले होते. माणूस या समाजाला जात पाट धर्मात दाखवून माणूस माणसाला अनोळखी झाला आहे. जातीने हिणवू जाऊ लागले आहे.

हा अमका आहे   तो टमका आहे !
तो ढमक्या आहे    जातीचा हा !!

माणसा माणसातील जात मात धर्म ह्या लादलेल्या गजकरणाला मुळासकट नाहीस कारण्यासाठी माणूस हा एक दाखविण्यासाठी असे काही उद्रेकी विचार वा क्रांतिकारी विचार मनात येतात ...

जातींची खरूज  धर्माचा तुरुंग !
लावून सुरुंग  उडवावे !!

राखेतून गाळू  अहंमाचे तन !
एकतेचे मन  पेरुनीया !!


हा समाज भौतिक सुखाच्या मागे धावता धावता खऱ्या आनंदाला मुकला आहे. जो-तो पैश्यामागे धावतो आहे. दिवसरात फक्त  पैसाच पैसा करतोय . नातेगोते संबंध प्राण-प्रतिष्ठा मान-सन्मान ह्या साऱ्या गोष्टी पैश्याच्या माध्यामातून मूल्यमापन करू लागला आहे. त्यातून मनाला भ्रम लावून जाणा-या अशा रचना उदयास येतात...

पैसा झाला मोठा  पैसा नाही छोटा !
पैशासाठी खोटा  बोले जो-तो !!

प्रवीण का स्तब्ध  टाळतोय शब्द !
पैसाच प्रारब्ध  बोलूनिया !!


ह्या व्यस्त जीवनात . घड्याळा पुढे धावणाऱ्या विचारास पावलास कोठेतरी विश्रांतीची बालक होऊन पुन्हा उनाड, खोडकर , मस्तीत जगण्याची इच्छा होते . मन प्रवृत्त करतो तसे करण्यास , व कृतीतून अमलात देखील आणतो ...

एक आला आहे  दिवस उनाड !
स्वतास लबाड  बनायचे !!

मज्याच  करूया   हल्ला कल्ला करू !
उडणा-या धरू    पाखरास !!

पतंगी बसुया  गिरक्या मारूया !
गरुड करूया  अचंबित !!


अधिक पैसा कमविण्याच्या उद्देशाने माणूस कधी आधी काम करतो वा लालसे आहरी जाऊन कळत नकळत वाईट कामे हातून होतात . त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात .

मूठभर अन्न  पोटासाठी हवे !
चोचले का? हवे  जिभेसाठी !!

सुरवात जणू  भ्रष्ठाचारातून !
हिंसाचारातून प्रवासात !!

सुरवात गोड   लालसा दावते !
शेवट भोवते   'कडूच' हो !!



ह्या धकाधकीच्या युगामध्ये भूत , वर्तमान , व भविष्यकाळ यात गुंतून पडलेली पिढीस अनेक प्रश्न पडलीत . नेमका विचार कुठला करायचा कशासाठी व का ? काळाशी निगडित सारे प्रश्न त्यांना बोचतात व खिळवून ठेवतात सुद्धा . या काळ चक्रविव्हात अडकून पडलेल्या जीवास मार्गस्त होण्यासाठी काळाची योग्य सांगाळ  घालणे अत्यावश्यक झाले आहे . त्याकरिता ...

उत्तम भविष्य   जगतो आपण !
भूत वर्तमान   कार्यातून !!

भूतकाळ असो  अनुभवपूर्ण !
असो कार्यपूर्ण  वर्तमान !!

प्रवीण भविष्य  साकार झालेया  !
वर्तमानी केल्या  कार्यातून !!


संत महात्म्य यांच्या वैश्विक विचाराने समाजात अभूतपूर्ण क्रान्ती झाली आहे. एक सकारात्मक विचार असंख्य अविचारांना मुळासकट नाहीसे करतात. फक्त आपले विचार सात्विक व शुद्ध असायला हवे ...

विचारांचे रोप   अंतरी लावून !
वैश्विक होऊन   तू फुलावे !!


आयुष्यामध्ये मनुष्य जन्माला आत्मिक समाधान प्राप्त होत जेव्हा त्याला स्व जन्म कशासाठी का? व त्याचा उद्देश काय हे कळात. तेव्हा त्या जीवाला परमोच्च आनंद प्राप्त होतो ...

शोधण्या तुजला   नको भटकंती !
आत्मजान अंती   आत्मज्ञान !!

प्रवीण उद्देश   हा फलित व्हावा !
स्व जन्म कळावा   जिवा तुला !!

लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होताना . काल्पनिक वास्तविक व त्याही महत्वाचे आंतरिक सत्याला पळताळून पाहण्याचं उत्तम माध्यम लेखणी होय .  विचार लेखणीतून प्रसवताना  उतरताना वास्तविकतेचं भान ठेवणं हेही महत्वाचे आहे . अभंगातून नुसते विचार नाही तर वैश्विक विचार लेखणीतून येन एवढे सामर्थ्य त्यात आहे . एवढे प्रभावी माध्यम संतांनी वारसा हक्कातून दिले आहे. पुढे हीच अभंगचळवळ कोठे हि खंड न पळता सातत्याने लेखणीतून उमटत राहील . असे प्रामाणिक इच्छा समस्त साहित्यिकांकडून व्यक्त करतो व येथेच क्रमशा बोलून थांबतो ...

शोधण्या माणसा   जाणण्या  माणसा !
तू आता माणसा   'माणूस' हो !!
    
मोह क्रोध हिंसा  त्यागुनी माणसा !
वृत्तीत माणसा  'अभंग' हो !!

- प्रवीण बाबुलाल हटकर 
मु.पो.ता. बार्शीटाकळी , जिल्हा अकोला 
४४४४०१
मोबाईल 8055213281 , 8390903817

No comments:

Post a Comment