Saturday, 15 July 2017


जीवनशास्र …

भुगोल
ब्रह्मांडाचा अभ्यास
माया मायनं मायाच 
चड्डीच्या भोकाले
ठिगळं लावता लावता शिकविला व्हता …
हा सूर्य हा चंद्र हे तारे
अशा अदभूत पद्धतीने
वेगवेगळ्या आकारा सह
डोयाले पुसत पुसत तिनं
मले भुगोलाचा तास गिरविला व्हता …

अर्थशास्र …
शेतीसाठी 'बा'नं काढलेलं
सावकारी कर्ज दरवर्षी फेडूनसुद्धा
कस वाढत जात
हे कुठलं कर्जाच शास्र
जे अजुनी माझ्या डोक्यावरून जात …

विज्ञान शास्र
जेव्हा नैसर्गिक सह कृत्रिम पावसाच्या
आशा मावळल्या
तेव्हा माझ्या बा सह आधुनिक तंत्र यंत्र कसदार जमिनीवर
वाट पहात बसले होते हात जोडून दैवी कृपा होण्याची

गणित शास्र

दरवर्षी प्रमाणे यदाही व्यापार्याला मातिमोल
किमतित विकलेल्या मालाचे
एकाएक गगनाला टेकलेले भाव
कसे वाढलेत
याचे गणित 'बा'ले अजूनही सुटलेले नाही

इतिहास …
शेतीसह धुरा वाचविण्या
बा सह पिढ्यान पिढ्या लटकून
घेतलेलं ते झाड
अजूनही उभे आहे साक्ष देत इतिहासाची
कदाचित वाट पहात माझी …

मानस शास्र…
माझ्या बा ले लटकलेल बघून
मायचं संतुलन बिघडलेलं पाहून
डॉक्टररानं गंभीर होऊन बोलले
मानसिक ताण देऊ नका …
सध्या पागलखाण्यात भरती करा …

समाज शास्र…
नात्य गोत्यासह समाजातील
हरेक घटका पुढे पसरवलेला
वयात आलेल्या बहिणीने मदतीचा पदर
रिकामाच राहिला
तेव्हा
मदत सोडून नजरेत कसे आले समाजाच्या
फाटक्यातील नग्न अंग डोळ्यात वासना येयीपर्यंत …

नागरिक शास्र…
ज्या वयात मतदान करण्याचा
साधा हक्कही नव्हता
त्या वयात कर्जाच डोंगर
व गहाण पडलेल्या घराच
घरपण वाचविण्याच नागरिकत्व वारसा हक्कात मिळालं ….

जीवन शास्र …
बा… मले सांगा हेच का ते
मरतावकती सांगलेलं
तीळ तीळ होऊन
जीव जीवासाठी
जीवन जगण्याच जीवनशास्र ….
हेच का ते बा... सांग ना ।।

-प्रवीण बाबूलाल हटकर
पाठलाग ...
ती अधूनमधून कवितेला
लाईक करत असते;
मनातल्या मनात झुरत असते.
कॉल हल्ली मिस्ड कॉल होत असतो.
तिचा फोटोजेनिक फेस
फोटोत हसत असतो
डोळ्यांत असंख्य वेदनांना तरंगत ठेवत,
सारंकाही दिसतं;
आतल्याआत मीही तुटत असतो
अगदी तुटलेल्या दोऱ्यातून
पतंग धावत सुटतो सैरावैरा
अगदी तसा.
पण, बोललो होतो तुला :
"नको जाऊस, मला सोडून
दूरवर कुठे कुठे नाही."
मी पाठलाग करत होतो
वेड्यासारखा, फकिरासारखा;
पार बावरून गेलो होतो
कैक मैलांपर्यंत
तुझ्या त्या ट्रँव्हल्समागे गाडीने;
नंतर तसाच धावत सुटलो होतो सुसाट;
पण तुझ्या वेगापुढे
माझा वेग मंदावला.
तू थेट जाऊन पोहचली,
यानने कुण्यातरी ग्रहावर.
मी बोललो होतो
तू हात सोडताना :
"पुन्हा कधीही हा हात
पुढे नाही येणार."
ती म्हणाली, "अनेक हात असतील
माझ्या अवतीभवती;
मग तुझ्या हाताची काय आवश्यकता?"
मी तिथेच संपलो होतो
तुझ्यासाठी कायमचा.
ती हल्ली म्हणे ह्या पोकळीतून
त्या पोकळीत फिरत आहे;
क्रमशः प्रवीण - वन, प्रवीण - टू
अशी नवीन नावे
मोठमोठ्या दगडांना, ग्रहांना देत.
कुणी अभिनंदन करण्यास
हात पुढे केला तर
ती सरळ 'नमस्कार' करते;
अन् दाटल्या डोळ्यांतून
अश्रूंसह हसत असते
अगदी मोनालिसासारखी...!
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला


गझल

जरा जरा खुणावते मनातल्या मनात ती
मला खुशाल जाळते मनातल्या मनात ती

तशी समोर टाळते निहाळते लपून का
उगाच का सतावते मनातल्या मनात ती

कधी मधाळ रात्र ती, कधी अधीर सांज ती
कधी पहाट हासते मनातल्या मनात ती

जरा बटास सोडता, जगास वेड लावते
मला तशीच बांधते, मनातल्या मनात ती

जशी नभात चांदणी तशी मनात साजनी
किती समीप वाटते मनातल्या मनात ती

कधी लकीर ओढते कधी लकीर खोडते
उगाच डाव मांडते मनातल्या मनात ती

कधी किशोर ऐकते रफी सुरात डोलते
खुशाल तार छेडते मनातल्या मनात ती

चराचरात तीच ती कणाकणात तीच ती
मला प्रवीण वाटते मनातल्या मनात ती

- प्रवीण बाबूलाल हटकर
8055213281




जीर्ण ...

ती,
अति संवेदनशील भावनेत असायची,
रात्र रात्र म्हणे रडत बसायची,
भावनिकतेच्या आभाळाने नेहमीच तुडुंब
भरलेली राहायची,
बोलण्यातही ओलाव्याच्या सरी बरसायच्या,
येवढी चिंब चिंब होती कल्पनेत,
जणू की ओतप्रोत भरलेला महाकाय समुद्रच ...
पण,
वास्तविकतेची एक झळ ,
तू सहन करू शकालीस का?
माझी तृष्णा शमवू शकलीस का?
मी तर उभा वाळवंट आहे...
जन्मोजन्मीचा तहानलेला ....
अन तू मला मिलनापूर्वीच दिसत आहे,
सुकलेल्या झाडावरील सुकलेल्या घामाच्या व्रणासारखी...
बुजलेली ,कुंजलेली, सडक्या अवस्थेत,
जीर्ण झालेल्या वास्तू सारखी ...

-प्रवीण बाबूलाल हटकर



लेखक परिचय 




नाव                   -   प्रवीण बाबुलाल हटकर 
जन्म वर्ष           -   २०. ०१ . १९८४ 
जन्म गाव          -   भंडारा 
कर्मभूमी            -    अकोला 
शिक्षण              -  बी. कॉम , एम. आर. आय. पी. एम ( मास्टर डिग्री )
नोकरी               -  रेडिओ सीटी ९१.१, अकोला 
पत्ता                   - गंगानगर , पिंपळखुटा रोड, मु. पो. ता. बार्शीटाकळी, जिल्हा अकोला. 
                             पिन कोड -  ४४४४०१ 
मोबाईल नंबर     - ८०५५२१३२८१ 

लिखाण आवड    - अभंग , गझल, व इतर कविता प्रकार तसेच समीक्षण ,ललित लेख .

 साहित्य प्रसिद्ध 
      माध्यम        - दैनिक  लोकमत, दैनिक सकाळ , दैनिक मातृभूमी, दैनिक पुण्यनगरी , दैनिक                                                 दिव्यमराठी, रेडिओ सिटी ९१.१ , इतर माध्यमे 


      पुस्तक         - माणसा अभंग हो ... हा अभंग संग्रह साहित्य व संस्कृती मंडळा तर्फे नवलेखन                                              अनुदानातून गमभन प्रकाशनाकडून १८.१२.२०१६ ला प्रकाशित झाला आहे.

                             आपले बहुमूल्य मार्गदर्शन मिळावे व नोंद घ्यावी . संप-काकरिता सोबत दूरध्वनी क्रमांक                              जोडला आहे.

आपलाच
-प्रवीण बाबुलाल हटकर