Saturday, 19 August 2017

जरा जरा खुणावते

गझल 

जरा जरा खुणावते मनातल्या मनात ती
मला खुशाल जाळते मनातल्या मनात ती

तशी समोर टाळते निहाळते लपून का
उगाच का सतावते मनातल्या मनात ती


कधी मधाळ रात्र ती, कधी अधीर सांज ती
कधी पहाट हासते मनातल्या मनात ती

जरा बटास सोडता, जगास वेड लावते
मला तशीच बांधते, मनातल्या मनात ती

कधी लकीर ओढते कधी लकीर खोडते
उगाच डाव मांडते मनातल्या मनात ती

कधी किशोर ऐकत रफी सुरात डोलते
खुशाल तार छेडते मनातल्या मनात ती

जशी नभात चांदणी  तशी मनात साजनी
किती समीप वाटते मनातल्या मनात ती

चराचरात तीच ती कणाकणात तीच ती
मला प्रवीण वाटते मनातल्या मनात ती

-प्रवीण बाबूलाल हटकर
- गझल -

श्री हरी विठ्ठल...

जागतो विठ्ठल, जाणतो विठ्ठल
अंतरी माझ्या नांदतो विठ्ठल

प्राण तू झाला, श्वास तू झाला
स्पंदनी दरवळ वाहतो विठ्ठल

माऊली तोची... ह्या जगी अवघ्या
पंढरी काशी, राहतो विठ्ठल

झाड तू देवा, मूळ तू देवा
रूप ब्रम्हांडी... पाहतो विठ्ठल

वादळे... येता, तू दिली छाया
संकटी आम्हा... तारतो विठ्ठल

बाप तू आहे, माय तू आहे
बा... तुझ्या चरणी, दंगतो विठ्ठल

सावळ्या रंगी, बा... तुझ्या नामे
रंगतो विठ्ठल, नाचतो विठ्ठल

चित्त हे निर्मळ, भावना सुंदर...
जीवलग भक्ता, पावतो विठ्ठल

पंढरी जागृत, हे कृपावंता !
तुज...दयावंता, वंदतो विठ्ठल

माझिया भक्ती, आपली शक्ती
एकरूप होता, रंगतो विठ्ठल

श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
भजन मी गाता, हासतो विठ्ठल

-प्रवीण बाबुलाल हटकर.
मो: ८०५५२१३२८१
अकोला.
"विठ्ठू तू प्रचंड" …. 



विठ्ठू अभिमान 

विठ्ठू समाधान !


विठ्ठू गुणगान


'करू' किती ? !!



विठ्ठू चराचर


विठ्ठू तू अंबर !


विठ्ठू तू आंतर


'झाकू' किती ? !!



विठ्ठू तू आरंभ


विठ्ठू नाम दंग !


विठ्ठू भक्ती संग


'रंगू' किती ? !!



विठ्ठू तू अभंग


"विठ्ठू तू प्रचंड" !


विठ्ठू तू अखंड


'दिपू' किती? !!



विठ्ठू तूच शक्ती


विठ्ठू तुझी भक्ती !


बा… तुझ्यात मुक्ती


'धावू' किती ? !!



(अभंग …. )

-प्रवीण बाबूलाल हटकर
गा… मल्हार विठ्ठू …

मी मल्हारी गातो
विठ्ठू गुणगान !
लाभे समाधान 
नाम विठ्ठू !!

मी मल्हारी भोळा 
देव माझा भोळा !
जपतोया माळा 
विठ्ठू विठ्ठू !!

पिवळ्या उन्हात 
बा… निळ्या नभात !
सावळ्या रंगात 
रूप विठ्ठू !!

मल्हार हाकितो 
मेंढ्या रानोरान !
गात विठ्ठू गान 
आनंदाने !!

प्रवीण मल्हार 
 बा… प्रवीण विठ्ठू !
गा… मल्हार विठ्ठू
एकनाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर
 
अनंत स्वरूप आहे, पांडुरंगा…

पांडुरंग दरबारी 
जमलेया वारकरी !
बा… भजतोया अंतरी 
पांडुरंगा !!

पांडुरंग कोण आहे 
जीवनाचे सार आहे !
अंतरीची हाक आहे 
पांडुरंगा !!

पांडुरंग काय आहे
कण ते ब्रम्हांड आहे !
अनंत स्वरूप आहे 
पांडुरंगा !!

आयुष्या गवसलेला 
पांडुरंग अर्थ आहे !
एकमेव सत्य आहे 
पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग 
गा समर्थ पांडुरंग !
बा… अमुचे अंतरंग 
पांडुरंगा !!

(अभंग… )

- प्रवीण बाबूलाल हटकर.
 
भक्तांचिया मर्जी , चाले पांडुरंगा ………. 

भक्ताचीया भक्ती
पांडुरंग ठायी !
भक्त गाथा गायी 
आवडीने !!

भक्तांचिया मर्जी 

चाले पांडुरंगा !
भोळ्या पांडुरंगा 

आदेशती !!

पांडुरंग माझा

सखा जिवलग !
आहे नातलग

अंतरीचा !!

पांडुरंग हरी

हरी पांडुरंग !
आहे अंतरंग

पांडुरंग !!

बोला पांडुरंग

पांडुरंग बोला !
हरी हरी बोला

पांडुरंग !!

पांडुरंग नामी

सुखाचा हा शोध !
समाधान बोध

एकमात्र !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
बा… तुझ्यात मुक्ती,आनंदाई … 

देवा पांडुरंग
पांडुरंग हरी !
मनाच्या या द्वारी
धाम तुझे !!

पांडुरंग माझ्या

हरेका श्वाशात !
बा… रगारगात

भिनलेला !!

ना कुठला स्वार्थ

ना कुठला मोह !
एक स्वार्थ मोह

नाम तुझ्या !!

पांडुरंग भक्ती

मिळे नाम शक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती

आनंदाई !!

पांडुरंग धागा

मन आहे मनी !
ओउनिया गुणी

एक होऊ !!

देवा ब्रम्हरूप

आहे विश्वरूप !
अनंत स्वरूप

पांडुरंग !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर