माणसा अभंग हो - प्रवीण हटकर
मानवी मन हे मुळातच आध्यात्मिक असते; सत्यवादीच असते. बघा, खोट बोलण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. आपण जस जसे वयानी वाढतो. तशी विकृतींची बाधा होऊन आपण मुल्याना पारखे होतो. त्यामुळे हजारो वर्षांपासून साधू संत आणि यती विचारवंत समाजाला सत्याकडे, सदाचाराकडे अंगुली निर्देश करून समकालीन भाषेत उपदेश करतात, त्याचे प्रबोधन करतात. पूर्वीचे संत हे कवीच होते आणि आजचे कवीही संतच आहे. प्रवीण हटकर ह्या कवीने अशाच प्रेरणेतून अभंग रचना केल्या आहेत. विशेष म्हणजे- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान प्राप्तीने या ह्या अभंगाचा संग्रह " माणसा अभंग हो " ह्या शीर्षका खाली प्रकाशित झाला. माणूस अभंग झाला पाहिजे - अशी विश्व कल्याणाची भावना ह्या शीर्षकात आहे. आज माणसाची वाणी , विचार आणि प्रत्यक्ष आचार ह्यात अभंगत्व नाही. बोलणे काही करणे वेगळेच ... ह्यावर हटकरांनी
" वाचन ना द्यावे
दिल्यास पाडावे l
नाच तू टाळावे
बोलुनिया ll ... असे हटकले.
कवीला आजच्या उत्ताण वागण्या - वस्र प्रावरणाकडे बघून खंत वाटते.
"जिथे झाकायचे
तिथेच फाटले
उगाच झाकले
तोंडास का ?
प्रवीण हटकरांच्या ह्या अभंगाने जीवन विषयक जवळपास सर्व अंगांना स्पर्श केला आहे, बुद्ध-विवेकानंद आणि चाणक्य- बिरबलाच्या प्रसंगावधानाची आठवण दिली आहे. ज्ञानार्जनाचा ध्यास आणि गुरुत्वाची ओळख, ह्या विषयाची विवेचन केले आहे. पर्यावरणाचे संवर्धन, कष्टाचे महत्व, मैत्री आणि बंधूभाव, विश्वास आणि सहकार्य ह्या मूल्यांचा पुरस्कार हटकरांनी प्रभावीपणे केला आहे.
प्रवीण हटकरांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. मराठी कशी लवचिक आणि कशी बोलण्या - ऐकण्यास गोड हे सांगून ते म्हणतात-
"मराठी मराठी
माऊली मराठी
होऊया मराठी
एकरूप "
या संग्रहात एकूण ४७ अभंग आहेत. विशेष म्हणजे गझलेप्रमाणे अभंगातही चरण असतात. जसा शेरांचा परस्परांशी संबंध आवश्यक नाही तसेच चरण ही स्वतंत्र आशयाचे असतात. त्यामुळे हटकरांनी कोणत्याच अभंगाला शीर्षक दिलेला नाही. काही अभंग अधिक चरणांचे तर काही ५-६ चरणांचे आहेत. या वरून कवी उगीच ओळी वाढवत नाही हे स्पष्ट होते. अभिव्यक्ती संपली की अभंग संपला. हा आटोपशीरपण हटकरांमध्ये गझलेतून आला असावा प्रा. डॉ. संतोष हुशेंची अत्यंत समर्पक अशी प्रस्तावना ह्या अभंग संग्रहाला लाभली आहे. मुद्रण जवळपास निर्दोष आहे. केवळ काही अभंगाची चरण मध्ये जागा न सोडता एकमेकांना लागूनच मुद्रित केल्यामुळे त्या पानावर दृष्टी भंजन होते. पुढील आवृत्तीत तो दोष हटकरांनी जातीने लक्ष घालून निराकृत करावा. ह्या संग्रहानिमित्य त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ...
शिवाजी जवरे,
बुलडाणा
९५११२६१४९३

No comments:
Post a Comment